मुंबई : मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांना उच्च न्यायालयाने आज अटकेपासून 9 जूनपर्यंत तूर्तास दिलासा दिला आहे.
जयकुमार गोरे यांच्याविरोधात ही कठोर कारवाई करणार नसल्याची हमी सातारा पोलिसांनी दिली होती. याची दखल घेत न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळला आणि जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी ९ जून रोजी निश्चित केली.
आज बुधवारी रोजी सुनावणीच्या वेळी न्यायालयाने विशेष सरकारी वकिलांना अपिल सुनावणीसाठी दाखल करून त्यावर अंतिम सुनावणीपर्यंत गोरे यांना अटक करणार का? अशी विचारांना केली. यावेळी सातारा पोलिसांनी तूर्तास अटक करणार नसल्याची हमी दिली. याची दखल घेत न्यायालयाने पुढील सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब ठेवली. तसेच, सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करू नका, असे निर्देश सातारा पोलिसांना दिले गेले.
खटाव तालुक्यातील मायणी येथील मातंग समाजाचे मृत पिराजी भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडीबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यामध्ये महादेव भिसे यांनी तक्रार करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी संजय काटकरला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दरम्यान, गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी वडूज न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर गोरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्या. नितीन सांबरे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गोरे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही. निव्वळ राजकीय हेतू आणि सूडबुद्धीने त्यांना गोवण्यात आल्याचे त्यांच्या वतीने अॅड. राजू पाटील आणि अॅड. संजीव कदम यांनी सांगितले. या जमिनीवर गोरे यांचा वैयक्तिक पातळीवर काहीही संबंध नाही. एका संस्थेचे पदाधिकारी असल्याने त्यांच्यावर आरोप करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील अॅड. श्रीकांत गावंड यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार आमदार गोरे असून गोरे त्याच्या विरोधातील सर्व पुरावे न्यायालयाच्या निदर्षनास आणून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.
काय आहे प्रकरण :
आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दहीवडी पोलिस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक जो मयत आहे त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्ताएेवज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. माण खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता, तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती.
हेही वाचा : Pravin Darekar on supriya sule : हात तोडण्याची भाषा करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर पोलिसांनी कारवाई करावी - भाजप नेते प्रवीण दरेकर