सातारा - सत्तेत असताना 1 रुपयाचे काम झाले नाही. मी कोणतेही काम घेऊन मंत्रालयात गेलो तर माझी फाईल कचऱ्याच्या डब्यात फेकली जायची. मात्र, विरोधी पक्षात असून सुद्धा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या विकासासाठी 15 हजार कोटीची कामे केली. त्यामुळे मी भाजपमध्ये गेलो, असे स्पष्टीकरण उदयनराजे यांनी दिले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सल्ला ही दिला. ते म्हणाले, या दोन्ही पक्षाला लोक सोडून का जात आहेत. याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी करावे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात पोहोचली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांची सातारा सैनिक शाळा मैदानावर जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी जोरदार भाषण करत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली.
हेही वाचा - बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? - मुख्यमंत्री
एक-दोन नाही तर आयुष्याच्या 15 वर्षांनंतर असा निर्णय मला का घ्यावा लागला? याचा विचार पक्षाने करायला हवा. पंधरा वर्षे माझ्या नावावर फुली होती. मी कोणती फाईल घेऊन गेलो की ती कचऱ्याच्या डब्यात टाकली जात होती. इतके सहन करुन सुद्धा त्यांनी माझी कामे केली नाहीत. त्यासाठी राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा तरी पुरस्कार द्यायला हवा होता, असे म्हणत राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला.
ते म्हणाले, मी पक्षात असून सुद्धा नसल्यासारखा होतो. मी जी कामे केली ती रेटून केली म्हणून झाली. सत्तेत असताना 1 रुपयांचे काम झाले नाही. मला या विकासकामांसाठी नळावर भांडावे लागते तसे पक्षाबरोबर भांडावे लागले. यावेळी उदयनराजे मुख्यमंत्री आधी देखील होते आणि आता देखील आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली.
हेही वाचा - भाजप स्वबळावर लढणार? मुंबईत खलबतं
कामे मार्गी लावणारे मुख्यमंत्री
सत्तेत असताना माझी कामे झाली नाहीत. मात्र, मी विरोधी पक्षाचा खासदार असून देखील युतीच्या काळात साताऱ्यामध्ये 680 कोटी रुपयांची काम केली. 15 हजार कोटीची रेल्वेची कामे झाली. घोगंड भिजत ठेवायचे काम राष्ट्रवादीने केले. अँग्रीकल्चर विद्यापीठाचा प्रकल्प, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र, मेडिकल कॉलेजबाबत मी आघाडी काळात पाठपुरवठा केला. मात्र, राष्ट्रवादीने उत्तर दिले जिल्ह्यात जागा कुठे आहे? त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सरकारी जागेची यादी मागवली आणि ती यादी 9 वेळा आघाडीच्या संबंधित मंत्र्यांना दिली. मात्र, तरीही आघाडी सरकारने खासकरुन राष्ट्रवादीने याकडे लक्ष दिले नाही. ते पुढे म्हणाले, माझा बँड वाजावयाचा विचार करु नका, कारण मी बँडमास्टर आहे.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर घुमजाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ चांगले काम करत आहेत. मला सुद्धा वाटले होते. ईव्हीएममध्ये काहीतरी घोटाळा असले पण मी स्वतः विचार केला तेव्हा लक्षात आले, की अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मार्गी लावली. त्यामुळे हा घोटाळा नाही हे माझ्या लक्षात आले.
हेही वाचा - शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भाजपमध्ये - नवाब मलिक
कृष्णा खोरेबाबत चौकशी समिती नेमा
कृष्णा खोरे प्रकल्प 2006 साली पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, 2019 उजाडले तरी पूर्ण झाले नाही. आघाडी सरकारने 13 वर्षे उशिर लावला. हा प्रकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीने योग्यप्रकारे राबवला नाही. त्यामुळे कृष्णा खोरेबाबत चौकशी समिती नेमा, अशी मागणी करत आघाडी सरकारने एक पिढी बर्बाद केली, अशी टीका उदयनराजे यांनी केली.
तुकड्यावर जगणारे आम्ही नव्हे
तुकड्याची भाषा करु नका, कारण सध्या या दोन पक्षाची अवस्था तुकड्या प्रमाणे झाली आहे. त्यांनी योग्यवेळी चिंतन केले असते तर आता आत्मक्लेश करण्याची वेळ आली नसते, असेही उदयनराजे म्हणाले.
हेही वाचा - 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर अप्रत्यक्ष टीका
साताऱ्याच्या विकासाबाबत फाईलवर सही करण्यासाठी मी संबंधित व्यक्तीकडे गेलो. त्यांच्या पेनमधील शाई संपली असेल असे मला वाटले. म्हणून पेन घेवून गेलो. पण सही न करता किल्ला म्हणत पेन त्यांनी खिशाला लावला.
हेही वाचा - ज्यांच्या गाडीवर कायम लाल दिवा राहिला ते स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात, जयंत पाटलांचा नाईकांना टोला
उदयनराजेंच्या भाषणातील इतर मुद्दे
- मुख्यमंत्र्यांनी कास पाणीपुरवठा योजनेसाठी मोठी मदत केली त्यामुळे पुढची 50 वर्षे सातारकरांना पाण्याची समस्या निर्माण होणार नाही.
- सातारा एमआयडीसी आणि नगरची एमआयडिसी एकाच वेळेस सुरुवात मात्र, आजच्या घडीला नगरच्या तुलनेत सातारची एमआयडीसी मागे राहिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातील उद्योगवाढीकडे लक्ष द्यावे.
- सातारा नगरपालिका हद्दवाढीचा प्रकल्प 50 वर्षापासून दुर्लक्षित आहे. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी इर्मासारखी योजना मुख्यमंत्र्यांनी लागू लागावी.