सातारा - कोयना धरणग्रस्तांच्या मंजूर मागण्यांच्या अंमलबजावणीस प्रशासनाने 2 वर्षे घालवली. येत्या 15 फेब्रुवारीपर्यंतची दिलेली मुदतही संपत आली आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत कोयना धरणग्रस्तांना प्रत्यक्ष जमीन वाटप सुरू न झाल्यास कोणत्याही क्षणी धरणग्रस्त जनतेला मंत्रालयावर धडक मारावी लागेल. मुंबईच्या आंदोलनाने भागले नाही तर कोयना बंद करू. मग कोयनेचा वणवा महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे.
कोयनानगर तालुका पाटण येथे श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने आयोजित कोयना धरणग्रस्तांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्रमुदचे हरिश्चंद्र दळवी, मालोजीराव पाटणकर, शलाका पाटणकर, चैतन्य दळवी, संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, श्रीपती माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - भाजप आमदार जयकुमार गोरेंवर शिवीगाळ व दमदाटी तर शिवसेना नेते शेखर गोरेंवर अपहरणाचा गुन्हा दाखल
डॉ. पाटणकर म्हणाले, कोयनेचे पाणी हे धरणग्रस्तांच्या अश्रूंचे पाणी आहे. हे आजवरच्या सरकारचे पाप आहे. धरणग्रस्तांच्या अश्रूंचे आता निखारे होऊ शकतात. कोयनेच्या जलाशयात वणवा पेटला आहे. तेथे गेलात तर आगीने होरपळल्याशिवाय राहणार नाही. कोयना धरणग्रस्तांचे अंतिम संकलन करून जमीन वाटपास प्रत्यक्ष सुरुवात करावी. 23 फेब्रुवारीपर्यंत जमीन पसंतीस लोकांना नेले नाही, तर त्यानंतर कोणत्याही दिवशी कोयनेचे धरणग्रस्त लोक आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसतील.
कोयना धरणग्रस्तांच्या लढ्यामुळे कोयनेच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. मात्र, 2 वर्षे घालवूनही प्रत्यक्ष जमीन वाटप सुरू झाले नाही. निर्वाह भत्ता नाही. मात्र, आता महाराष्ट्राचे नंदनवन करणारे कोयना धरणग्रस्त मुंबईला येत आहेत. आता हात हालवत परत येणार नाही. बैठकीपासूनचा भत्ता घेऊनच परत येऊ. मुंबईच्या आंदोलनाने भागले नाही तर कोयना बंद करू. कोयनेचा वणवा मग महाराष्ट्र भर पेटल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शेवटी डॉ. पाटणकर यांनी दिला.
हरिश्चंद्र दळवी (गुरुजी) म्हणाले, श्रमिक मुक्ती दल आहे तेथे न्याय नक्की आहे. कोयना धरणग्रस्तांच्या लढ्यामुळे वाढीव 74 वसाहतींना मान्यता मिळाली आहे. या वसाहतींना 18 नागरी सुविधा देण्यासाठी सूचना मिळाल्या आहेत. बैठकीपासून प्रतिमहिना 3 हजार रूपये निर्वाह भत्ता मंजूर करून घेतला आहे. तो आम्ही पदरात पाडून घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. फुकटच्या श्रेयासाठी काहीजण बिबा घालायचे काम करत आहेत, अशांना त्यांची जागा धरणग्रस्त जनताच दाखवून देईल.
यावेळी मालोजीराव पाटणकर, चैतन्य दळवी, श्रीपती माने, जगुबाई चव्हाण यांनी धरणग्रस्तांच्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. सचिन कदम यांनी स्वागत व आभार मानले. मेळाव्यास विठ्ठल सपकाळ, बळीराम कदम, परशुराम शिर्के, सीताराम पवार, अर्जुन सपकाळ, अनिल देवरुखकर, राजू मोरे, कमल कदम, लाड यांच्यासह तालुक्यातील कोयना धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - कोणताही बंद पाळणार नाही; कराडच्या व्यापार्यांचे निवेदन