सातारा - अवघ्या काही तासांवर बैल पोळा (बेंदूर) येऊन ठेपला आहे. मात्र, यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या तीन महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. लाॅकडाउनच्या कालावधीत सर्व बाजारपेठा बंद असल्याने शेताकऱ्यांचा माल शेतातच सडून गेल्याने बळीराजा पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. आशा दयनीय परिस्थितीत बळीराजाने बैल पोळा साजरा करायचा तरी कसा? या विवंचनेने बळीराजाचे डोळे पाणावले आहेत.
कायम निसर्गाच्या अकृपेमुळे अनेक लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे. कृषीप्रधान भारत देशातील विविध राज्यातील शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गोठ्यातील बैलजोडी आणि पोटची लेकरं बळीराजाला सारखीच असतात. दरवर्षी पेरणीच्या धांदलीतून मोकळे झाल्यानंतर बळीराजा आषाढ महिन्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो.
खांदमळणीला बैलांच्या मानेवरती तूप आणि हळद लावून औताच्या ओझ्यांनी दुखावलेल्या मानेचा मसाज केला जातो. त्याचबरोबर डोक्याला आंब्याचे पानांचे तोरण बांधून खाण्यासाठी गव्हाचा गोड खिचडा केला जातो. तसेच बेंदूर सणादिवशी बैलांचे औक्षण करून तेल, गुळवणी, अंडी असे स्निग्ध पदार्थ पाजून शरीराची झालेली झीज भरून काढली जाते. त्याचबरोबर बैलांच्या शिंगाला रंग लावून बेगडांची सजावट करून सगळ्या गावातून भव्य मिरवणूक काढली जाते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संसर्गजन्यामुळे भव्य मिरवणूक न काढता घरीच बैलजोडीचे पूजन केले जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
कोरोनामुळे मागील तीन महिने लाॅकडाऊन होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. नकळत या लाॅकडाऊनच्या कालावधीत शेतीकडे बळीराजाचे दुर्लक्षच झाले. कारण शेतात काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नव्हते. वीजपंप दुरस्ती करता येत नव्हता, शेतीची आवजरेसुद्धा दुरूस्त करता येत नव्हती. लाॅकडाऊनमुळे सर्वच बंद होते. या सर्व गोष्टीमुळे बेंदूर सनावरती मोठा परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.