सातारा - कोरोना साथरोगाच्या लाटेत अडलेल्या रुग्णांना बेड व रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळवून देण्याचा गोरखधंदा कसा चालतो, हे स्पष्ट करणारी ऑडिओ क्लिप सातारा जिल्ह्यात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन स्वत: दखल घेऊन संबंधितावर काय कारवाई करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांमधील संवादात हा भांडाफोड झाला आहे. या क्लिपमध्ये गावातील कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळवून देताना 'चहा-पाण्यासाठी काही रक्कम काढून ठेवायला पाहिजे होती, असे एक कार्यकर्ता सुचवतो. त्यावर दुसरा कार्यकर्ता 'रुग्णाला डिस्चार्ज देताना काहीतरी सेटलमेंट करु' असे सांगतो. "
' एका व्यक्तीकडून 2800 रुपये दराने रेमडीसिव्हर घ्यायचं. रुग्णाकडून पैसे घ्यायचे आणि तिन-साडेतीन किंवा चार हजाराला एक-एक डोस विकायचा. रेमडिसिव्हर इंजक्शनचा 5-5 मिनिटाला रेट बदलतो. बेड बघ म्हणून कोपर्डेतील एकाचा फोन येतोय. मी डॉक्टरशी बोलून जुगाड लावलंय. आपलं अन् दोघांचं निम्मं निम्मं ठेवूयात, असे डॉक्टरला सांगितलं आहे. 'त्या व्यक्तीकडून 2800 नं इंजक्शन घेऊन पेशंटला द्यायचं. ब्लॅकनं इंजक्शन घ्यावं लागेल, असं सांगायचं. एकाचे 5 हजार घ्यायचे, त्याचे अठ्ठावीसशे-तीन हजार काय असेल ते द्यायचे' असा दोघातील संवाद आहे. एका डॉक्टरच्याही नावाचा या संभाषणात उल्लेख आहे.
'त्याने बेडचे 9 हजार रुपये सांगितले. त्याला 'आपलं कसं काय' विचारलं तर 'तू आधी वाढवून सांगायला पाहिजे होते. तुझे तुला काढुन दिले असते' असं डॉक्टरने त्याला सांगितल्याचे क्लिपमधील कार्यकर्ता सांगतो आहे.
'इंजक्शन मिळणार नाही, असं दाखवून त्यात जादा पैसे काढ. रुग्णाला बेड पण मिळवून द्यायचा आणि बाकीच्यापण भानगडी बघायच्या', असं एक कार्यकर्ता दुसऱ्याला सुचवतो आहे. त्यावर दुसरा कार्यकर्ता शेवटी 'आता धंदा म्हणूनच करतो' असं आश्वासीत करत आहे.
महामारीमध्ये लोक उपचारांसाठी तळमळत आहेत. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकत्यांचा बुरखा घालून उखळ पांढरे करु पाहणारे काही ठराविक मंडळींचा सुकाळ आहे. अनावधानाने ऑडियो किल्प व्हायरल झाल्याने, अशा तथाकथितांचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करुन महामारीत औषधांचा गोरखधंदा करणाऱ्यांना प्रशासनाने जरब बसवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या संदर्भात संभाषण रेकार्ड करणाऱया खंडाळा तालुक्यातील संबंधित कार्यकर्त्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्याने 'आपण पुण्यात असून, या क्लिपशी माझा संबंध नाही. राजकीय हेतूने कोणीतरी ती क्लीप केली आहे' असे सांगितले.