कराड (सातारा) - गुंजभर सोन्यासाठी दहन केलेल्या मृतदेहाची रक्षा अज्ञाताने चोरल्याचा प्रकार कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत घडला आहे. या अजब चोरीमुळे नगरपालिका प्रशासनही चक्रावून गेले. चोर कशाची चोरी करतील, याचा काही नेम राहिलेला नाही, हेच या घटनेवरून सिद्ध झाले आहे.
एखादी महिला मृत झाल्यानंतर अंत्यसंस्कारावेळी सोन्याचा मणी तिच्या तोंडात ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. परंतु त्या गुंजभर सोन्यासाठी स्मशानभूमीतून रक्षाच चोरी करण्याचा अजब फंडा आता चोरट्यांनी अवलंबल्याचे कराडमध्ये पहायला मिळाले.
मृत महिलांचे दहन केल्यानंतर तिची रक्षा नदीत विसर्जित केली जाते. ज्या ठिकाणी ती रक्षा सोडतात, त्या ठिकाणी काही लोक सोन्यासाठी तेथील वाळू, माती काढून ती चाळतात. ग्रामीण भागात हे चित्र पहायला मिळते. मात्र, कराडसारख्या शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीतून रक्षा चोरीला गेल्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा स्मशानभूमीकडे वळविल्याचे स्पष्ट झाले आहे.
लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका कर्मचार्यांना बरीच कामे करावी लागत आहेत. त्यामुळे कराडच्या स्मशानभूमीत सध्या सुरक्षा रक्षक नाहीत. याचाच फायदा घेऊन चोरट्याने रक्षा चोरल्याची घटना घडली.
तांत्रिक कारणामुळे सध्या स्मशानभूमीत सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे रक्षा चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. लवकरच स्मशानभूमी सर्व बाजूंनी बंदिस्त केली जाणार आहे, असे या संदर्भात मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.