सातारा - पक्षीमित्र संस्थेतर्फे देण्यात येणार्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावर्षीचा 'पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार' पुणे येथील बाळासाहेब कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. येत्या जानेवारीमध्ये रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे होणार्या ३३ व्या पक्षीमित्र संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
हेही वाचा - 'मन की बात'मध्ये आता 'जन की बात'..
गेली चार दशके महाराष्ट्रात कार्यरत असणार्या पक्षीमित्र संस्थेतर्फे देण्यात येणार्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार गोंदिया येथील मुकुंद धुर्वे, पक्षीमित्र संशोधन-जनजागृती पुरस्कार सिन्नरच्या डॉ. प्रशांत वाघ आणि अमळनेरच्या अश्विन पाटील यांना विभागून देण्यात येणार आहे. येत्या जानेवारीमध्ये रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे होणार्या ३३ व्या पक्षीमित्र संमेलनात हे पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे संचालक व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.
यंदाचा स्व. रमेश लाडखेडकर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार हा दीर्घकाळ पक्षीमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन व जनजागृती करणार्या पर्यावरण लेखक बाळासाहेब कुलकर्णी (पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे. ५ हजार रूपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्ष्यांवरील उपचाराच्या चळवळीत कार्य करणार्या मुकुंद धुर्वे (गोंदिया) यांना देण्यात येणार आहे. स्व. डॉ. व्ही. सी. आंबेडकर स्मृती पक्षीमित्र संशोधन व जनजागृती पुरस्कार पक्षी अभ्यास, संशोधन आणि जनजागृती करणार्या डॉ. प्रशांत वाघ (सिन्नर) आणि अश्विन पाटील (अमळनेर) यांना विभागून देण्यात येणार आहे. २ हजार रूपये रोख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह, असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे दि. ११ व १२ जानेवारी रोजी ३३ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिन्ही पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याचे रोहन भाटे यांनी सांगितले आहे.