कराड (सातारा) - आसाम - मिझोराम सीमेवर उद्भवलेल्या परिस्थितीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्माच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटद्वारे केला. तसेच, पंतप्रधानांनी आंतर राज्य परिषदेची बैठक बोलावून ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे, असेही चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
हेही वाचा - महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्याच्या दोन दिवसांनी (सोमवारी) वादग्रस्त आसाम - मिझोराम सीमेवर हिंसाचार भडकला. आसाममधील कच्छर जिल्हा आणि मिझोराममधील कोलासिब जिल्ह्याच्या सीमेवरील भागात गोळीबार झाला. यामध्ये 5 पोलीस ठार झाले, तर मूळचे पुण्याचे असलेले कच्छरचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सुद्धा गोळीबारात जखमी झाले. जखमी निंबाळकर आणि अन्य पोलीस लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. ईशान्येकडील हिंसाचाराला शहा आणि आसामचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने आंतर राज्य परिषदेची बैठक बोलावून शांतता प्रस्थापित केली पाहिजे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.
हेही वाचा - सातारा जिल्ह्याला 100 कोटींचा निधी; पुनर्वसनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची अजित पवार यांची सूचना