सातारा - महाबळेश्वर-प्रतापगडाजवळचा अंबेनळी घाट तब्बल 48 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारपासून (दि. 8 सप्टेंबर) हलक्या चारचाकी वाहनांसाठी खुला झाला. जड वाहनांना या घाटातून वाहतूक तुर्त बंदी राहणार आहे. घाटरस्ता खुला झाल्याने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली 22 गावे पुन्हा सातारा जिल्ह्याला जोडली गेली.
करावा लागायचा 300 किलोमिटरचा फेरा
जुलैच्या 22, 23 व 24 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबनेळी घाट रस्ता अनेक ठिकाणी तुटून दरीत कोसळला होता. रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे 21 जुलैपासून या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे किल्ले प्रतापगडासह या भागातील 22 गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. या 22 पूरग्रस्त गावात मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनास कोकणातील दोन जिल्हे पार करून साधारण 300 किलोमिटरचा प्रवास करावा लागत होता. काही वेळा 14 किलोमिटर डोंगर उतरून या भागात पोहोचावे लागत होते. घाटातील वाहतूक बंद झाल्याने सातारा जिल्ह्यातून कोकणात जाणारी भाजीपाल्याची वाहतूकदेखील बंद पडली होती. किल्ले प्रतापगडावरील पर्यटनही बंद पडले होते.
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
या घाटातील रस्त्याची दुरूस्तीचे काम सावर्जनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. मुसळधार पाऊस, थंडी, दाट धुके अशा प्रतिकूल परीस्थितीत शासनाच्या मदती शिवाय हे काम सावर्जनिक बांधकाम विभागाने सुरू ठेवले व 45 दिवसांत ते पूर्ण केले. मंगळवारी या कामाची तहसीलदार सुषमा चौधरी पाटील , पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रसेठ राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार आदी मान्यवरांनी अंबेनळी घाटाची पाहणी केली.
अवजड वाहनांना तूर्त बंदच
खबरदारीचा उपाय म्हणून सध्या काही दिवस या घाटातून हलकी चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. जड वाहनांसाठी हा घाट सध्या तरी बंदच राहणार आहे. घाटातून वाहतूक सुरू झाली असली तरी वाहनचालकांनी या घाटातून वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. अद्याप काही ठिकाणी या घाटातील रस्त्यावर सुरक्षा कठडे नाहीत. त्यामुळे वाहन चालविताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - कराड : जनावरांच्या शेडमध्ये शिरला बिबट्या, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण