सातारा- माण खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या बरोबर 'आमचं ठरलयं' मध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी आहेत की नाहीत, या प्रचाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले .
या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी) ,माजी आमदार दिलीप येळगावकर (भाजपा), अनिल देसाई (भाजपा), रणजितसिंह देशमुख (शिवसेना), अनिल पवार (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मामुशेठ वीरकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, अशोक गोडसे, संदिप मांडवे, सुरेंद्र गुदगे, दिलीप तुपे, सत्यवान कमाने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकर म्हणाले की, माण-खटाव तालुक्यातील गुंडगिरी संपुष्टात येण्यासाठी, सुसंस्कृत माणसे राजकारणात आली पाहीजेत. यासाठी माण मतदारसंघात परिवर्तन होणे काळाची गरज आहे. माण – खटाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या दहशतीला आवर घालायची असेल तर त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. प्रभाकर देशमुख अत्यंत सभ्य, मनमिळावू, हुशार, दुरदृष्टी असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे देशमुख यांना आम्ही पाठींबा देत आहोत, अशी भावना या मान्यवरांनी व्यक्त केली.
प्रभाकर देशमुख हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजनेचे ते प्रणेते आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे माण–खटाव तालुक्यातील जनतेमध्ये सहानुभूतीची लाट उसळली आहे. सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तेही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. सामान्य लोकांनी त्यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. अशातच आता त्यांना ‘आमचं ठरलंय’ या मोहिमेअंतर्गत सगळ्या पक्षांनी पाठींबा जाहीर केला आहे.
माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या काळात माण–खटावमध्ये गुन्हेगारी वाढली. विकास फारसा झाला नाही. विशेष म्हणजे, सुसंस्कृत विदवान, अधिकारी यांच्यात त्यांनी मोठी दहशत निर्माण केली. गावागावांत त्यांनी टवाळखोर कार्यकर्त्यांची फौज तयार केली. हे कार्यकर्ते सभ्य लोकांवर शिरजोर होऊ लागले. आमदाराच्या विरोधात कोणी बोलू लागला तर त्याचे तोंड दाबण्याचे प्रकार होऊ लागले. इतरांना तुच्छ लेखणे, ताटाखालचे मांजर बनविण्यास भाग पाडणे, गुर्मीत बोलणे असे यथेच्छ दुर्गूण आमदार गोरे यांच्यामध्ये ठासून भरले आहेत. अशी भावना या पत्रकार परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केली. त्यामुळे गोरे यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. परिणामी गोरे यांना ही निवडणूक चांगलीच अडचणीची ठरणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.