सातारा- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ४२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागांनी तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा तालुक्यातील अंबवडे बु. या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाची पहाणी केली. यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमूग (६० हेक्टर), कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला व आले (१२० हेक्टर), खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा (७० हेक्टर), कराड भात, ज्वारी (२० हेक्टर), पाटण तालुक्यातील भात (२०० हेक्टर), खंडाळा तालुक्यातील भाजीपाला (५ हेक्टर), वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला (१५ हेक्टर), महाबळेश्वर तालुक्यातील भात (३० हेक्टर), फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी (३९० हेक्टर), माण तालुक्यातील ज्वारी व मका (५१० हेक्टर), असे एकूण १ हजार २४० हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच, भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवस बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तरी, अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे. या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते.
हेही वाचा- राजेशे टोपे पूर्ण माहिती न घेताच वक्तव्य करतात, अमित देशमुखांचा सरकारला घरचा आहेर