सातारा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झालेल्या प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे आव्हान स्वीकारल्याची ग्वाही रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील दिली. १२ जूनला झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे सहकार्य घेण्याचा ठराव झाला होता. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांचे अध्यक्षतेखाली एक सहविचार सभा स्थायी समितीच्या सभागृहात झाली. त्यावेळी डॉ. अनिल पाटील बोलत होते.
ज्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या माऊलीसमान शाळेची सेवा करण्याची संधी 'रयत'ला मिळत आहे, अशी भावना डॉ. पाटील यांनी व्यक्त केली. गुरुकुल प्रकल्प सुरू करणे, डिजीटल स्कूल, गणित-विज्ञान व भाषा प्रयोगशाळा सुरू करणे, शेती शाळा, शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण, सयाजीराव हायस्कूल व कल्याणी हायस्कूलमधील सर्व उपक्रम राबवले जातात, ते सर्व उपक्रम प्रतापसिंह हायस्कूलमध्ये राबवले जातील. येत्या पाच वर्षांत प्रतापसिंह हायस्कूल हे सातारा शहरातील अग्रमानांकित शाळा म्हणून नावारुपाला येईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
प्रतापसिंह हायस्कूलला उभारी आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक उपक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक ते शिक्षक प्रतिनियुक्तिवर घ्यावेत. रयत शिक्षण संस्थेमार्फत मार्गदर्शक समन्वयक नेमून त्यांना आवश्यक ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाची सुरुवात ज्या शाळेपासून झाली ती शाळा देशाच्या अस्मितेचा विषय आहे. राज्य शासनाने या शाळेच्या सुधारणेसाठी दोन वर्षापूर्वी ५० लाख दिले आहेत. नविन शालेय इमारत, मैदान इत्यादी सोई सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. जसे गाव दत्तक घेतले जाते, तशी प्रतापसिंह शाळा 'रयत'ने दत्तक घ्यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी सांगितले.