सातारा: जालन्यातील अॅड. किरण लोखंडे हत्येच्या (Adv Kiran Lokhande murder case) गुन्ह्यातील फरारी संशयित विकास गणेश म्हस्के यास सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून मोळाचा ओढा परिसरात शिताफीने जेरबंद केले (Kiran Lokhande murder accused arrest). गुन्हा घडल्यापासून गेली चाळीस दिवस तो फरारी होता. (Satara Crime)
हत्याकांडातील आरोपीस अटक- जालना शहरातील अंबड चौफुली भागातील अर्चना नगरमध्ये पत्नीने दोन मित्रांच्या मदतीने पती अॅड. किरण लोखंडे यांची हत्या केली होती. या गुन्ह्यात फरारी असलेल्या विकास गणेश म्हस्के (रा. आनंदनगर, अंजठा कॉलेज पाठीमागे, जालना) या संशयितास सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोळाचा ओढा परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चाळीस दिवस होता फरारी- अॅड. किरण लोखंडे हत्येच्या गुन्ह्यातील फरारी संशयित विकास गणेश म्हस्के हा गुन्हा घडल्यापासून गेली चाळीस दिवस फरारी होता. तो सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरामध्ये येणार असल्याची माहिती सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाला कारवाईची सूचना केली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून संशयित विकास गणेश म्हस्के याला पकडले. कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला जालना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गॅस स्फोटात पतीच्या मृत्यूचा केला होता बनाव- अॅड. किरण लोखंडे यांचा घरातील गॅस स्फोटात मृत्यू झाल्याचा बनाव पत्नी मनिषा लोखंडे हिने केला होता. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी पत्नीच्या कटाचा भांडाफोड करून हत्येचा गुन्हा उघडकीस आणला. दोन मित्रांच्या मदतीने डोक्यात लोखंडी रॉड मारून पतीची हत्या केल्याची कबुली दिली होती म्हणून या प्रकरणी पत्नी मनिषा आणि तिचा मित्र गणेश मिट्रू आगलावे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, विकास म्हस्के हा फरारी होता.
सातारा पोलीस अधीक्षकांकडून कौतुक - जालना जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या अॅड. किरण लोखंडे हत्या प्रकरणातील फरारी संशयिताला शिताफीने जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी कौतुक केले आहे. अपर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फड़तरे, लक्षमण जगधने, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी ही कारवाई केली.