कराड (सातारा)- तारळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून पाणी सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. पाणीसाठा सांडवा पातळीपर्यंत पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे २ हजार क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे तारळी नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन कण्हेर कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.
पाटण तालुक्यातील तारळी धरणात बुधवारी (दि. १२) सकाळी ८ वाजता एकूण पाणीसाठा ७१.२५ टक्के झाला होता. पाणीपातळी ७०२.१५ मीटर होती. धरणामधील पाणीसाठा सांडवा पातळीपर्यंत (म्हणजेच ७०६.३० मीटर) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे २ हजार क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे तारळी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे तारळी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये. नदीकाठालगत असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन अथवा तत्सम सामुग्री आणि पशुधन सुरक्षितस्थळी हलविण्याची सूचना करवडी-कराड येथील कण्हेर कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा ७८ टीएमसी झाला असून धरणात २० हजार ५८१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तसेच गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ४३, नवजा येथे ५२, महाबळेश्वर येथे ७३ आणि वळवण येथे ५२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.