कराड (सातारा) - कोरोना विषाणूविषयी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, असे आवाहन करण्यात आले असूनही काही नागरिक व्हॉट्स अपवरील ग्रुपमध्ये खोटी किंवा चुकीची माहिती पसरवात. त्यामुळे त्यांच्याोविरोधात पोलीस कारवाई करण्यात येत आहे. विद्यानगरमध्ये २ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याची खोटी माहिती व्हॉट्स ग्रुपवर पसरवणाऱ्या एका तरुणावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सागर उर्फ समाधान चंद्रकांत तारळेकर (वय २१, रा. सैदापूर, ता. कराड), असे त्याचे नाव आहे. गुन्हा नोंदविण्यात आलेल्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एखाद्या व्यक्ती, समूह, धर्म अथवा कोरोना अनुषंगाने अफवा पसरविणारे खोटे मेसेज तयार करून वॉट्सअप ग्रुपवर वायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. खोटे मेसेज फॉरवर्ड न करता पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.