सातारा - वाई तालुक्यातील भुईंज येथील मोक्काच्या गुन्ह्यातील फरार गुंड बंटी जाधवसह त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पंजाबमधून ताब्यात घेतलं. बंटी जाधवर 15 गुन्हे दाखल आहेत. भुईंजच्या खूनाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता.
अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव वय 24, निखिल शिवाजी मोरे वय 24 दोघेही रा. फुलेनगर भुईंज ता. वाई व मयूर महादेव साळुंखे वय 35 कालगाव ता. कराड अशी अटकेत असलेल्या संशयितांची नाव आहेत. बंटीला यापूर्वीच मोक्का लावण्यात आला आहे.
हेही वाचा - चार हजार द्या.. निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट घेऊन जा; मानखुर्दमधील लॅबचा प्रकार
अपहरण करून खून
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले, भुईंज येथील गुंड बंटी जाधव याची टोळी होती. या टोळीतील सहकाऱ्यांच्या मदतीने भुईंज येथील असले पुलावर राहणाऱ्या युवकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली होती. या घटनेनंतर बंटीने तेथून पलायन केले होते.
हातावर तुरी देऊन पलायन
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बंटी जाधव याने मोटारीतून साथीदारांसह वाई शहरात प्रवेश केला होता. यावेळी रविवार पेठेतील दुसऱ्या टोळीच्या वर्चस्ववादातून लाठ्या-काठ्या घेऊन दहशत माजवत प्रतिस्पर्धी टोळीवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकारानंतर वाई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जाधवने पलायन केले होते. त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.
पोलिसांच्या हालचालींची ठेवायचा खबर
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व त्यांची टीम बंटी जाधव याचा शोध घेत होती. बंटी आपल्या साथीदारांसह नेपाळमध्ये असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी नेपाळ मध्ये जाऊन त्याचा शोध घेतला. पण बंटीला नेपाळ सीमेवर असताना पोलीस पथक आपल्या मागावर असल्याची खबर मिळाली असावी. त्यामुळे तो नेपाळला न जाता पंजाब मधील भटिंडा प्रांतात गेला. सातारा पोलीस पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंजाब मध्ये जाऊन बंटीसह तिघांना ताब्यात घेतलं. या कामगिरीबद्दल सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी अभिनंदन करत कौतुक केलं.
हेही वाचा - 'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'