सातारा : गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुंड अभिनंदन झेंडे याला कराड पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. सातारा जिल्ह्यातून तडीपार करून देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेला बाधा येत होती. त्याच्या विरोधात कराड शहर पोलिसांनी जिल्हाधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला जिल्हाधिकार्यांनी मंजुरी दिली आहे. या कायद्यान्वये झालेली सातारा जिल्ह्यातील ही पहिली कारवाई आहे. कराड पोलिसांनी एमपीडीए कायद्याचा श्रीगणेशा केला आहे.
अभिनंदन झेंडेवर गंभीर गुन्ह्यांची नोंद : अभिनंदन रतन झेंडे (वय 35, रा. शाहू चौक, कराड) याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी नोकरास मारहाण करणे, खंडणी, जबरी चोरीसारखे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याला सातारा जिल्हयातून तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या.
कायदा, सुव्यवस्थेसाठी एमपीडीएचा प्रस्ताव : गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करणे अशक्यप्राय झाल्याने आणि कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्यांकडे गुंड अभिनंदन झेंडे याच्याविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत प्रस्ताव पाठवला होता. प्रस्तावाची शहानिशा आणि खातरजमा करून जिल्हाधिकार्यांनी प्रस्तावाला मंजुरी देत अभिनंदन रतन झेंडे यास 1 वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात एमपीडीएचा श्रीगणेशा : सातारा जिल्ह्यात कराड शहर पोलिसांनी कुख्यात गुंडावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड कायद्याचा श्रीगणेशा केला आहे. सातारा जिल्ह्यात या वर्षात झालेली ही पहिली कारवाई ठरली आहे. या कारवाईमुळे कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अन्य गुन्हेगारी टोळ्यांना मोठा दणका बसला आहे. जिल्ह्यातून हद्दपार होऊनही छुप्या हालचाली सुरू असणार्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी एमपीडीएची कारवाई महत्वपूर्ण ठरणार आहे.
आतापर्यंत कराडमधील 61 जण तडीपार : कराड शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा बी. आर. पाटील यांनी चार्ज घेतल्यापासून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 61 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या हालचालीवर कराड शहर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. गुन्हेगारीपासून परावृत्त न झाल्यास त्यांनाही एमपीडीए कायद्यान्वये कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच कराड शहर पोलिसांनी अभिनंदन झेंडेवरील कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.