सातारा - तरुणाला अश्लील मेसेज पाठवून त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( Young Man Honey Trap In Sarara ) आहे. याप्रकरणी आता वाई तालुक्यातील दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली ( Wife Husband Arrested Police Honey Trap ) आहे.
आणखी लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता - पुनम हेमंत मोरे व हेमंत विजय मोरे ( मूळ गाव ओझर्डे ता. वाई हल्ली रा. कुडाळ ता. जावळी ) असे पोलिसांनी अटक केलेल्या दाम्प्त्याचे नाव आहे. या दोघांनी आणखी काही जणांना जाळ्यात अडकवून फसवले असून, त्यांनीही पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र, या दोघांव्यतिरिक्त त्यांनी अनेकांना फसवले असण्याची शक्यता आहे. त्यांनी वाई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी केले आहे.
पाठवत होती अश्लील मेसेज - जितेंद्र सोपान जाधव ( वय ३० रा. बोपेगाव, ता. वाई ) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. ते एका पतसंस्थेत शिपाई म्हणून काम करतात. त्यांच्या कार्यालयात एका महिलेने मला नोकरीची गरज आहे. येथे नोकरी मिळेल काय, असे सांगून जाधव यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या क्रमाकांवर अश्लील मेसेज पाठवून त्यांना एका हॉटेलात भेटायला बोलवले. या महिलेच्या पतीने माझ्या पत्नीला अश्लील मेसेज का पाठवले, अशी दमदाटी करून बदनामीची धमकी दिली. त्यापोटी त्यांच्याकडून दोन लाख ८९ हजार ५०० रुपये उकळले. यानंतर पुन्हा बदनामीची व ठार मारण्याची धमकी देऊन पुन्हा दोन लाख रुपयांची मागणी केली.
कंटाळून केली तक्रार - या प्रकाराला कंटाळून जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी दोघांनाही जेरबंद केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक फौजदार रविंद्र तेलतुंबडे, विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांनी केली.
हेही वाचा - ओबीसी एम्पिरिकल डाटा वेळेत पूर्ण करणार- सामाजिक न्याय मंत्र्यांचा दावा