पुणे - विश्रांतवाडी परिसरात किरकोळ कारणावरून एका टोळक्याने बेदम मारहाण करत तरुणाचा खून केला. मंगळवारी (२१ जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली. सागर महादेव भालेराव (वय-24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी पसार झाले. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सागर हा रोजंदारी करून उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर तो मित्रांसह विश्रांतवाडीतील गणपती चौकातून पायी जात होता. त्याचवेळी सागरने मित्र असल्याचे समजून एका दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला आवाज दिला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील 'एका तरुणाने तू आवाज का दिला' असे म्हणत त्याच्याशी वाद घातला.
त्यानंतर आणखी काही दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने वाद घालत सागरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागरच्या मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणाला ताब्यात घेतले नाही. आरोपी लवकरच पकडले जातील आणि त्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले.
हेही वाचा - ऐकावं ते नवलच... चक्क वडाच्या झाडाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड !