सातारा - कराड-पाटण मार्गावर काल रात्री भरधाव कंटेनरने एका दुचाकीस्वाराला चिरडल्याने तो जागीच ठार झाला. अमित पांडुरंग पाटील (वय २९, रा. सुपने, ता. कराड), असे त्याचे नाव आहे. कंटेनरने आणखी एका दुचाकीला धडक दिली. मात्र, दुचाकीस्वार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडल्याने तो बचावला. अपघातानंतर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.
काल रात्री आठच्या सुमारास चिपळूणकडून कराडकडे येणाऱ्या सोळा चाकी भरधाव कंटेनरने मुंढे-विमानतळ हद्दीतील डायमंड शुगर जवळ दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात कंटेनर दुभाजकावर चढला, तर या अपघातात दुचाकीस्वार कंटेनरखाली चिरडला जाऊन जागीच ठार झाला. तसेच, दुसऱ्या दुचाकीवरील साकुर्डी (ता. कराड) येथील अझर शेख हा तरुण कंटेनरच्या धडकेने पलीकडच्या रस्त्यावर जाऊन पडला. कंटेनरने दुभाजक उद्ध्वस्त केल्याने कराड-पाटण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा - अपघाताचा थरार! मोटारीची दुचाकीला धडक, पाहा घटनेचा लाईव्ह व्हिडीओ
अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, महामार्ग वाहतूक मदत केंद्राच्या अस्मिता पाटील, उपनिरीक्षक भरत पाटील यांच्यासह कराड शहर पोलीस ठाण्याचे आणि महामार्ग वाहतूक केंद्राचा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन क्रेनच्या साहायाने कंटेनर रस्त्यावरून बाजूला काढण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अपघात इतका भीषण होता, की चक्काचूर झालेल्या दुचाकीचे तुकडे शोधून काढावे लागले. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या मार्गावर गेल्या आठ-दहा दिवसात लहान-मोठे सहा अपघात झाले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत. रस्त्यासह दुभाजकांची अर्धवट कामे तातडीने पूर्ण न केल्यास विजापूर-गुहागर मार्ग बंद पाडू, असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
हेही वाचा - महाबळेश्वर तालुक्यात 42 पैकी 28 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध