सातारा - आठवडाभरापूर्वी कराड तालुक्यातील टेंभू या गावातील ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील एकास अटक केली. विकास बाळकृष्ण माने (वय 35), असे अटक केलेल्या संशयीत चोरट्याचे नाव आहे. त्याने चोरलेली ट्रॉली पोलिसांनी जप्त केली आहे.
टेंभू (ता. कराड) येथील शेतकरी संजय तुकाराम निकम यांच्या ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र. एम. एच. 50 व्ही. 6057) दि. 14 डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. संजय निकम यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द ट्रॉली चोरीची फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नरसिंहपूर (ता. वाळवा) येथील एकाकडे चोरून आणलेली ट्रॉली असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस नरसिंहपूरला गेले. त्या ठिकाणी त्यांना टेंभू गावातून चोरून आणलेली ट्रॉली आढळली. पोलिसांनी ट्रॉली चोरीप्रकरणी विकास बाळकृष्ण माने याला अटक केली. तसेच ट्रॉलीही जप्त केली. ट्रॉली चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे. अनेक गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाही. विकास माने याच्याकडून ट्रॉली चोरीचे अन्य गुन्हेही उघडकीस येतील, असे कराड ग्रामीण पोलिसांनी सांगितले.