सातारा - कराडमधील एका हॉटेलच्या लॉनवर साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी 14 तोळ्यांचे दागिने असलेली पर्स लंपास केली. या संदर्भात सविता सुधीर पाटील (रा. वारुंजी-विमानतळ, ता. कराड) यांनी काल रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा - साताऱ्यात नाईट कर्फ्यूच्या पहिल्याचदिवशी ढिलाई
सविता पाटील यांच्या एका नातेवाईकाचा कराडमधील एका हॉटेलच्या लॉनवर काल दुपारी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. साखरपुड्यासाठी जाताना त्यांनी आपले दागिने पर्समध्ये ठेवले होते. साखरपुड्यानंतर नवरीसोबत फोटो काढण्यासाठी जाताना त्यांनी आपली पर्स शेजारील खुर्चीवर ठेवली होती. फोटो काढून परत आल्यानंतर त्यांना खुर्चीवर पर्स दिसली नाही, म्हणून त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु, पर्सबाबत आम्हाला काही माहिती नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
4 लाख 80 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास
अज्ञात चोरट्यांनी लंपास केलेल्या पर्समध्ये 4 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या सहा बांगड्या, 35 हजारांचे एक तोळ्याचे ब्रेसलेट, 25 हजारांची ७ ग्राम वजनाची अंगठी, असा 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. याप्रकरणी सविता पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक स्वामी हे घटनेचा तपास करत आहे.
हेही वाचा - अत्याचार प्रकरणी आरोपीला 10 वर्षे कारावास, 50 हजार रूपये दंडाची शिक्षा