सातारा - सातारा ते सांगली हे १३० किलोमीटर अंतर धावून पूर्ण करणारे 'अल्ट्रा' हे श्वान समस्त सातारकरांचे आकर्षण ठरले. त्याच्यासोबत धावायला आणि प्रोत्साहन द्यायला साताऱ्यातील मुख्य रस्त्यांवर आज एकच गर्दी लोटली होती.
धावदूत ठरलेल्या या 'अल्ट्रा'च्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी साताऱ्यात ५ किलोमीटरची दौड पार पडली. शिवाजी सर्कलमधून सुरू झालेल्या दौडेचा शाहू चौक राजपथावरुन गोलबागेस वळसा मारुन मोती चौक आणि पुढे कर्मवीर पथावरुन पुन्हा पोवई नाक्याला येऊन समारोप करण्यात आला. या दौडेमध्ये अबालवृध्दांसह श्वानप्रेमी, धावपटू, क्रीडाप्रेमी सहभागी झाले होते.
हेही वाचा - कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन करणार, इंदोरीकरांचा सावध पवित्रा
22 आणि 23 फेब्रुवारीला आयोजित सातारा ते सांगली या 130 किलोमीटर अंतराच्या वीर स्मरण आणि सन्मान दौडमध्ये साताऱ्यातून निरंजन पिसे आणि मारुती चाळके सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अनाहूतपणे एका भटक्या श्वानाने दौड पूर्ण करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्या श्वानाचे नंतर 'अल्ट्रा' असे नामकरण करण्यात आले.