सातारा - कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथील मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना मृत बिबट्या आढळून आला. प्रथमदर्शनी त्याचा मृत्यू दिड ते दोन महिन्यांपूर्वी झाला असल्याचे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसात, निमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू झाला, असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
२ महिन्यांपुर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज -
कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथील जोमलिंग फाट्याजवळ, अशोक थोरात यांच्या 'मोहिता' नावाच्या शिवारात ऊसतोडणी सुरू होती. ही ऊस तोडणी सुरू असताना तोडणी कामगारांना सरीमध्ये मृत बिबट्या आढळून आला. तात्काळ त्यांनी कराड येथे वनविभाग व माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्याशी संपर्क केला. घटनास्थळी तत्काळ वनरक्षक अशोक मलप व कर्मचारी दाखल झाले. बिबट्याचा मृत्यू होऊन साधारण दिड ते दोन महिने झाले असावे, असा परिस्थितीजन्य अंदाज आहे.
घातपाताची शक्यता नाही : भाटे
पंचनामा झाल्यानंतर कराडच्या वनविभागाच्या कार्यालय आवारात पशुसंवर्धन अधिकारी संजय हिंगमिरे यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे सर्व अवयव मिश्या, नखे व दात हे सुस्थितीत होते. त्यामुळे बिबट्याचा मृत्यु नैसर्गिक असल्याचे मत वन्यजीव गुन्हा नियंत्रण संघटनेचे सदस्य रोहन भाटे यांनी व्यक्त केले.
३ वर्षांचा मादी बिबट्या -
शरीरावर कोठेही जखमांचे व्रण नव्हते. बिबट्याचे फक्त निम्मे कातडे व हाडे शिल्लक राहिली होती. जमिनीवर टेकलेल्या शरीराच्या बाजूची पूर्ण कातडी ही जीर्ण होऊन किड्यांनी खाऊन संपवली होती. मृत बिबट्या ही मादी होती व संपूर्ण वाढ झालेली होती. तिचे अंदाजे वय 3 वर्षे असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बिबट्याचे दहन -
शवविच्छेदनानंतर बिबट्यास दहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल ऐ.बी.गंबरे, प्राणी मित्र रोहित कुलकर्णी, वनरक्षक अशोक मलप, अरुण सोळंकी व वनकर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा- जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करुन घेतला सर्वांचा निरोप
हेही वाचा- 'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई