सातारा- कोल्हापुरात असलेल्या मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे जात असलेल्या दाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कराड तालुक्यातील उब्रंज हद्दीत आज पहाटे चारच्या सुमारास घडली. अमित आप्पाजी गावडे (वय.३८) आणि डॉ. अनुजा अमित गावडे (वय.३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
लॉकडाऊनमुळे गावडे दाम्पत्याची मुले कोल्हापूरला अडकली होती. त्यांना आणण्यासाठी गावडे दाम्पत्य कारने पुण्याहून कोल्हापूरला निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून बाजूच्या लेनवर जाऊन पलटी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गावडे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
कटावणीच्या सहायाने कारचे दार तोडून गाडीत अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यात आले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइनचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुडे व उब्रंज पोलिसांनी धाव घेवून मदतकार्य केले.
हेही वाचा- दिलासादायक..! साताऱ्यातील 6 जण कोरोनामुक्त, बाधितांची संख्या 115वर