सातारा - एका गुन्ह्यातील फरार आरोपीच्या शोधात पळसावडे येथे पोलीस गेले असतात्यांना दमदाटी व शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गुन्ह्यातील फरार झालेले आरोपी पळसावडे येथे आले असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पळसावडे येथे गेले होते. त्यावेळी दत्ता सिध्दनाथ जाधव, जगन्नाथ दादा जानकर व दीपक रघुनाथ शेंडगे या तिघांनी 'तुम्हा गावात कशाला आले आहे', असे म्हणत अर्वाच्य भाषेत दमदाटी व शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. फरार आरोपीला वाचवण्याच्या उद्देशाने केलेली हालचाल पोलिसांच्या लक्ष्यात आल्याने पोलिसांनी संबंधित तीन लोकांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे करीत आहेत.