कराड (सातारा) - रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 8 लाखांच्या मदतनिधीचा धनादेश साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील एक दिवसाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या मदतीचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
कोरोना काळात कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती केली. त्याचबरोबर कारखान्याच्या 40 हजार सभासदांना मोफत घरपोच हॅन्ड सॅनिटायझर वाटप केले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना मास्क, हॅन्ड सॅनिटायझर सारख्या सुरक्षा साधनांची उपलब्धता करून दिली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे रोज थर्मल स्क्रिनिंग केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.