कराड (सातारा) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे विवाहासाठी गेलेल्या पाटण तालुक्यातील विहे गावातील 13 जणांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले. यानंतर विहे गाव आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत सुमारे 150 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यातील 72 नमुन्यांचा अहवाल आला आहे.
हेही वाचा - नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पोलीस आयुक्तांचा इशारा
73 जणांचे नमुने प्रतिक्षेत -
विहे गावातील वर्हाडाच्या दोन ट्रॅव्हल्स रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लग्नासाठी गेल्या होत्या. दोन्ही ट्रॅव्हल्समधून 70 लोक प्रवास करत होते. लग्न समारंभ उरकून गावी आल्यानंतर एकाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली असता चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हाय रिस्कमधील आणखी चार जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील तीन जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे लग्नाला गेलेल्या वर्हाडातील 72 जणांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. यात आणखी 13 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे पुन्हा 73 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय यंत्रणेने विहे गावात येऊन सर्वांचे नमुने घेतले आहेत.
कडकडीत बंद -
विहे गावात एकावेळी 13 जण कोरोनाबाधित आढळल्यानंतर पाटण तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणेने विहे गावात धाव घेतली. ग्रामपंचायत आणि ग्रामदक्षता समितीने गाव आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन संपुर्ण गाव सॅनिटाईझ केले. गावातील सर्वजण मास्कचा वापर करत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. विहे गाव हे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे महामार्गाकडेला दुकाने, संस्थांची कार्यालये आहेत. लॉकडाऊनमुळे बसस्थानकावरील सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे.
हेही वाचा - नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सरसावले; मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक सर्व त्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती विहेचे उपसरपंच अविनाश पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन