सातारा: कराडमधील मारुतीबुवा कराडकर मठाच्या विश्वस्त तथा अध्यक्षाच्या डोक्यात विणा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी मठाचे तत्कालिन मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांना दोषी धरून कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. टी. साखरे यांनी सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
दिंडी काढण्यावरून वाद: मारुतीबुवा मठाचे विश्वस्त तथा अध्यक्ष यशवंत दाजी माने हे 23 एप्रिल 2019 रोजी मठामध्ये आले होते. त्यावेळी मठाधिपती बाजीरावमामा कराडकर आरडाओरडा करीत आले. दिंडी कशी काढता ते बघतो, असे म्हणत लोकांशी वाद घातला. यशवंत माने यांच्याकडे पाहून तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्यांच्या डोक्यात विणा घातला. या हल्ल्यात यशवंत माने गंभीर जखमी झाले. तेथे उपस्थित असलेल्या मोहन चव्हाण व अशोक शिंगण यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
मठाधिपतींवर खुनी हल्ल्याचा गुन्हा: या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात बाजीरावमामा कराडकर उर्फ बाजीराव जगताप यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. पी. किर्दत व उपनिरीक्षक भरत चंदनशिवे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्यावतीने या खटल्यात अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब संबंधित घटनेत महत्वपूर्ण ठरले आहेत.
सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा: खटल्याच्या सुनावणीवेळी साक्षीदार, पंच, तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. टी. साखरे यांनी बाजीराव जगताप यांना 7 वर्ष सक्तमजुरी आणि 7 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकिलांना अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. संध्या चव्हाण व अॅड. कोमल लाड यांनी सहकार्य केले.
हेही वाचा: Hearing on Shiv Sena: राज्यातला सत्ता संघर्ष! सुनावणी सत्र सुरूच, उद्या शिंदे गट बाजू मांडणार