कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा-कागल दरम्यानच्या अपघात प्रवण क्षेत्राच्या सुधारणेसह उड्डाणपूल, अंडरपास पुलांसह दुरुस्तीच्या काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी 558 कोटी 24 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी निधीची घोषणा केली. या निधीतून होणार्या कामांमुळे रस्ते प्रवास सुरक्षित होणार आहे.
सहापदरीकरणाबरोबरच दुरुस्तीची कामे
मलकापूर (ता. कराड) येथील नव्या उड्डाणपूलासाठी 459 कोटी 52 लाख रुपये, मसूर फाटा येथील अंडर पास पुलासाठी 47 कोटी 18 लाख, इंदोली फाटा अंडर पास पुलासाठी 45 कोटी 35 लाख आणि काशीळ फाटा येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस दीड कि. मी. अंतराच्या सर्व्हिस रस्त्यासाठी 6 कोटी 19 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. सातारा-कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाबरोबरच ही कामेही होणार आहेत.
महामार्गाच्या कामांसाठी निधीची मागणी
खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातारा जिल्ह्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी निधीची मागणी केली होती. सातारा ते कागल या 132 कि. मी. अंतरामध्ये महामार्गाची झालेली दुरवस्था, धोकादायक परिस्थिती, अपघातांचे प्रमाण आणि अपघाती मृत्यू याकडे गडकरींचे लक्ष वेधले होते. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या काळात खा. श्रीनिवास पाटील यांनी हे मुद्दे लावून धरत महामार्गासंदर्भातील मागण्यांचा पुनरूच्चार केला होता.
558 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर
गडकरी यांनी सातारा-कागल महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रांच्या (ब्लॅक स्पॉट) सुधारणेसह उड्डाणपूल आणि अंडरपास पुलांसाठी 558 कोटी 24 लाखांचा निधी मंजूर केला आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील इतर अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करुन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला कळविण्यात यावेत. त्याबाबतही तातडीने निर्णय घेण्यात येईल, असेही गडकरींनी पाटील यांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले होते. त्याबाबतही लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरटीओ अधिकार्यांसमवेत बैठक घेऊन अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करण्याचे काम हाती घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.