कराड (पाटण) - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग विश्वाचा कणा असणार्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाणीसाठ्याने पन्नाशी गाठली आहे. रविवारी (18 जुलै) सकाळी कोयना धरणातील पाणीसाठा 50 टीएमसी झाला. तथापि, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत केवळ 25 टक्केच पाऊस झाला आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यात 22 टीएमसीने वाढ
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय होऊन 50 दिवस झाले आहेत. या कालावधीत पाणलोट क्षेत्रात 1,200 मिलीमीटर पावसाची नोंद आणि धरणाच्या पाणीसाठ्यात 22 टीएमसीने वाढ झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक ओलांडले असले तरी पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही.
पावसाचे आगार
वास्तविक कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला पावसाचे आगार समजले जाते. पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 1,263 मिलीमीटर, नवजा येथे 1,726 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 1,763 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी धरणात 28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता.
वीजनिर्मितीसाठी 7.80 टीएमसीचा वापर
1 जूनपासून आतापर्यंत धरणात 31 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी 7.80 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या कोयना धरणाची पाणी पातळी 2107.3 फूट आणि पाणीसाठा 50.04 टीएमसी झाला आहे.
हेही वाचा - VIDEO : कांदीवलीतील पे अँड पार्कमध्ये शेकडो वाहने बुडाली, ईटीव्ही भारत प्रतिनिधीकडून आढावा