सातारा- वाई-सुरुर रस्त्यावर वनाधिकाऱ्यांनी सापळा रचून खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या पाच संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेल्या दुर्मीळ खवल्या मांजरासह एक चार चाकी व एक दुचाकी जप्त केली आहे.
संशयित सराईत गुन्हेगार-
वनविभागाच्या भरारी पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्या मदतीने ही कारवाई केली. दिलीप बाबुराव मोहिते (वय 50), अक्षय दिलीप मोहिते (वय 23, दोघेही रा.पिंपोडे बु. ता.कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (वय 50 रा. धावडी ता. वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय 34 रा. भालेकर ता. वाई) व प्रशांत भीमराव शिंदे (वय 44 शिरगाव ता.वाई) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून असे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
एक साथीदार फरार-वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण मिळालेले दुर्मीळ खवल्या मांजर विक्रीसाठी काही लोक घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली. त्याआधारे सुरूर फाटा ते वाई दरम्यान वनविभागाने सापळा रचला होता. संशयित विक्रीच्या उद्देशाने जिवंत खवल्या मांजर घेऊन चारचाकी गाडीमधून आले. गाडीमध्ये एका पोत्यात खवल्या मांजर असल्याची खात्री झाल्यावर तत्काळ धरपकड करून पाच जणांना अटक करण्यात आली. या धामधुमीत त्यांचा सहावा साथिदार पळाला. त्याचा तपास सुरु आहे.
वाघाएवढेच खवल्या मांजराला संरक्षण-
खवल्या मांजर ही एक दुर्मीळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत या प्राण्याला वाघाएवढेच संरक्षण दिले गेले आहे. त्यानुसार शिक्षेत सात वर्षे सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड, अशी तरतूद आहे. तसेच वन्यजीव शिकार व तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी नजीकच्या वनविभागास कळवावे, माहीती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईत वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे, भरारी पथक वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाझुर्णे, वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड, विजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर, सुहास पवार, दिनेश नेहरकर हे सहभागी होते.