कराड (सातारा) - माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण-कराडचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील नवीन पुलाला अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. तसेच पुलासाठी 45 कोटींची तरतूद झाली असल्याची माहिती आ. चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील पूल हा पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि सांगली जिल्हा एकमेकांशी जोडणारा दुवा आहे. सध्याचा पूल खचल्यामुळे काही महिन्यांपूर्वी पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम विभागाची बैठक घेऊन पुलाच्या मजबुतीचा अहवाल मागविला होता. त्यानंतर फक्त हलक्या वाहनांसाठी हा पूल सुरू करण्यात आला होता.
हेही वाचा - 'खुन्यांना पाठीशी घालणारं सरकार सचिन वाझेंना पुरावे नष्ट करण्याची संधी देतंय का?'
65 लाखांचा निधी मंजूर -
अवजड वाहतूक तसेच उसाचे ट्रॅक्टर कराड शहरातून जात होते. शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडत होता. थोड्या अंतरासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. शेतकर्यांच्या मागणीनुसार रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवरील पुलाचे महत्त्व लक्षात घेऊन पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन पुलाच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले. त्यानुसार अर्थसंकल्पात नवीन पुलासाठी 45 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदा या पुलाच्या सुरूवातीच्या कामासाठी 65 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन पूल उभा राहिल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील रेठरे बुद्रुक, खुबी, गोंदी या गावांसह सांगली जिल्ह्याला जाण्यासाठी दळणवळण सुकर होणार आहे. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठीही हा पूल महत्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा - ६० ते ८०च्या दशकातील दुचाकींचा संग्रह असणारा कर्नाटकातील 'सिव्हिल इंजिनिअर'