सातारा - आसले (ता. वाई) येथील ओंकार कैलास चव्हाण या बेपत्ता युवकाचा खून झाला असून हा प्रकार लूटमार व अनैतिक संबंधातून घडल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२ फरार
संशयित सहा जणांनी ओमकार चव्हाण याची हत्या करून त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रकार करून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. रोहन राजेंद्र यादव (वय १८), रोहित संजय घाडगे (वय २०), समाधान उर्फ जंप्या राजेंद्र शिंदे (वय १९) व सलीम राजासाहेब शेख (वय १८) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून फरार झालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. यापैकी एक पोलीस रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे.
गोपनीय बातमीदाराचा उपयोग
या संदर्भात धीरज पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी 2020 रोजी ओमकार कैलास चव्हाण (रा. आसले, ता. वाई) हा दुपारी साडेचार वाजता पाचवड येथे नेट कॅफेत जाऊन येतो असे सांगून गेला. तो माघारी आला नाही. कैलास चव्हाण यांनी भुईंज पोलीस स्टेशनला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार ६ जानेवारी रोजी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश गर्जे व सहकाऱ्यांचे पथक तयार करून तपासाची गती वाढविली. सात जानेवारी रोजी पोलिसांच्या पथकाला ओमकार चव्हाण याचे गावातील मुलांनी अपहरण करून त्याचा खून केल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
अनैतिक संबंधातून खून
पोलिसांनी या प्रकरणात चार संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ओमकार याचे चार जानेवारी रोजी अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. या खुनात चार संशयितांसह आणखी दोघांचा समावेश असून त्यातील एक रेकॉर्डवरच्या गुन्हेगार आहे. ते दोघे संशयित फरार असून त्यांचा पोलीस पथकाकडून शोध सुरू आहे. मृत ओमकारला चौघांनी अपहरण करून त्याला दुचाकीवरून कृष्णा नदीच्या काठावर नेले. तेथे ओमकार याला दांडक्याने बेदम मारहाण करून ठार मारले. नंतर ओमकारचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तत्पूर्वी त्याच्या हातातील सोन्याची अंगठी व मोबाइल संशयितांनी काढून घेतला. ओमकार याचे संशयितांपैकी एकाच्या बहिणीबरोबर संबंध होते. त्यातूनच हा प्रकार केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
'हे' आहेत तपासातील शिलेदार
या कारवाईत सहायक फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, रोहित निकम , सचिन ससाणे, वैभव सावंत, संकेत निकम, केतन शिंदे, संजय जाधव, गणेश कचरे यांनी भाग घेतला.