सातारा - खावली तालुका सातारा येथील मातोश्री वृद्धाश्रमातील 23 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. यातील चार लोक लक्षणं रहित तर उर्वरित 19 लोक लक्षण विरहीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
चौघांना लक्षणे-
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खावलीच्या मातोश्री वृद्धाश्रमात
सुमारे 30 ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यातील चार जणांना कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यामुळे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चौघेही बाधित असल्याचं निष्पन्न झाले. त्यामुळे आरोग्यविभागाने वृद्धाश्रमात सर्वच नागरिकांची तपासणी केली असता उर्वरित 24 पैकी 19 लोक कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज प्रशासनाला प्राप्त झाला.
18 जण विलगीकरणात-
बाधितांपैकी लक्षणे 4 असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना जंबो कोरोना हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. तर 18 लक्षणंविरहित बाधितांवर वृद्धाश्रमातच विलगीकरणात ठेवून उपचार केले जात असल्याचे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ल्ये यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे प्रशासनापुढे चिंतेचा विषय बनला आहे. मातोश्री वृद्धाश्रमात एकाच वेळी बाधितांची मोठी संख्या आढळून आल्याने आरोग्य प्रशासन या ज्येष्ठांवर लक्ष ठेवून आहे.
445 जणांचे नमुने तपासणीला-
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 230 नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात आले. तर 445 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील परिस्थिती-
- एकूण नमुने -3 लाख 55 हजार 978
- एकूण बाधित -59 हजार 979
- घरी सोडण्यात आलेले -56 हजार 492
- मृत्यू -1 हजार 864
- उपचारार्थ रुग्ण-1 हजार 623
हेही वाचा- राज्यात मंगळवारी 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 56 मृत्यू