कराड (सातारा) - पुणे-बंगळुरू महामार्गाजवळच्या आशियाई मल्टीपर्पज हॉलमध्ये क्वाॅरंटाईन केलेल्या 21 परप्रांतीयांनी सोमवारी रात्री पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील आटके या गावच्या हद्दीत सर्वजण क्वाॅरंटाईन होते. पलायन करणाऱ्या २१ जणांवर मंगळवारी रात्री कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
ई सेवरनम, जगल टी, वसंत एस, कृष्णा राजन, दिनेश डी, तमिल वरमन सी, व्यंकटेश के, अजित आर, विजय, मुकेश, सत्य, व्यंकटेश, व्यंकटेश, मुरगन, रघुकुमार, प्रदीप, पार्थी, महेश, हरो, लक्ष्मण, व अजित (पुर्ण नावे, पत्ता नाही), अशी क्वाॅरंटाईन असताना पळून गेलेल्या संशयितांची नावे आहेत.
लॉकडाऊनंतर वाहने बंद झाली. वाहन मिळत नसल्याने परप्रांतिय पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरून चालत आपल्या गावी निघाले होते. त्यातील काहीजण तामिळनाडूसह अन्य राज्यातील गावांकडे चालत निघाले होते. चालत निघालेल्या सुमारे शंभर लोकांना महसूल विभागाने कराड तालुक्यातील आटके गावच्या हद्दीतील विराज मल्टीपर्पज हॉलमध्ये क्वाॅरंटाईन केले होते. तेथे त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच त्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा होता. सोमवारी (दि. १३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यातील २१ जण मल्टीपर्पज हॉलच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. मात्र, ते सापडले नाहीत. त्यानंतर मंगळवारी २१ जणांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.