कराड (सातारा) - लॉकडाऊनमुळे नोकरीनिमित्त पुणे, मुंबईतील लोक मिळेल त्या वाहनाने गावाकडे येत आहेत. मुंंबईत नोकरी करणारी 22 वर्षांची युवती गावी येण्यासाठी चुकीच्या वाहनात बसली आणि साताराऐवजी सोलापूरला पोहचली. तेथून परत गावी कसे जायचे, असा प्रश्न तिला पडला. तिने थेट पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. देसाई यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्या मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यास सांगितले. त्यामुळे ती सुखरूप आपल्या गावी पोहचली.
मुंबईमध्ये नोकरी करणारी पाटण तालुक्यातील लुगडेवाडी गावातील 22 वर्षीय तरुणी गावी येण्यासाठी एका वाहनात बसली. ते वाहन सोलापूरकडे जाणारे होते. घाईगडबडीत त्या युवतीच्या हे लक्षात आले नाही. ते वाहन सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावात पोहचल्यानंतर आपण चुकीच्या वाहनात बसून आल्याचे तिच्या लक्षात आले. गौडवाडी गावातील ललिता सिताराम होवळ या महिलेने माणुसकीच्या नात्याने त्या युवतीला आपल्या घरात आसरा दिला.
आपण चुकीच्या वाहनात बसून सोलापूर जिल्ह्यात पोहचल्याची माहिती त्या युवतीने आपल्या कुटुंबीयांना दिली. तसेच पाटणचे आमदार शंभूराज देसाई हे गृहराज्यमंत्री आहेत. ते नक्की मदत करतील, या भावनेतून तिने थेट देसाई यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. घाईगडबडीत चुकीच्या वाहनातून मी सोलापुरात पोहचले असून गावी पोहचविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती तिने देसाई यांना केली. देसाईंनी तातडीने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.
तसेच पाटण पोलीस ठाण्याच्या अधिकार्याचे पत्र तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे देवून गाडी पाठवून देत आहोत. त्या मुलीस तातडीने तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, असेही देसाईंनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सांगितले. मनोज पाटील यांनी गौडवाडी गाव ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते, तेथील पोलीस निरीक्षकांना सूचना देऊन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यास सांगितले. अशा रितीने ती मुलगी अखेर पाटण तालुक्यातील आपल्या लुगडेवाडी या गावी पोहचली.
तातडीने मदत केल्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि गौडवाडी गावात आसरा दिलेल्या ललिता ओव्हळ यांना त्या तरुणीने धन्यवाद दिले.