सातारा - जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसांत २२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये साताऱ्यासह कराड शहराच्या मध्यवर्ती भागात रुग्णा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कराडमध्ये १५ रुग्ण, तर हॉटस्पॉट ठरलेल्या मलकापुरात ५ तर वनवासमाचीत येथे २ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८ दिवसांत वाढून ११४ वर पोहोचला आहे.
सातारा-शाहूपुरीतील अर्कशाळानगरमध्ये बाधिताच्या मावशीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कराडच्या मंगळवार पेठेतील महिला बाधिताच्या घरी दूध घालत असल्यामुळे तिला देखील संसर्ग झाला आहे. चारही बाजूने कोरोनाचा कहर वाढत असताना कराडमधील गमेवाडी येथील बाळंतणीला, तर उंब्रजमधील डॉक्टर (बालरोग तज्ज्ञ) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच सातारा कारागृहात आतापर्यंत ५ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या गुरुवारी जिल्ह्यात फक्त ४३ कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र, ८ दिवसांत हा आकडा अडीचपटीने वाढून ११४ वर पोहोचला आहे.