सातारा - दुष्काळ जाहीर करून ६ ते ७ महिने उलटल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. २५ जानेवारीला चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. मात्र, प्रशासन आणि राज्य शासनात असलेला दुरावा यामुळे चारा छावण्या सुरू होण्यास एप्रिल महिना उलटला आहे. त्यामुळे 'शासनाचे वराती मागून घोडे' असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यानंतर २ दिवसापूर्वी २० चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आले आहे.
माण तालुक्यातील २० गावात चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापैकी १० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चारा आणि पाणी उपलब्ध नसल्याने पशुधन अल्प किमतीत विकण्याची वेळ दुष्काळी भागातील शेतकऱ्यांवर आले आहे.
दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. जिल्हाप्रशासनाकडे विविध संस्थांचे ८० ते ९० प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, यातील २० चारा छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उर्वरित भागात कधी छावण्या मंजूर होणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
माणदेशी फाउंडेशनच्या छावणीत जनावरांची मोठी संख्या आहे. म्हसवड येथे माणदेश फाउंडेशनच्यावतीने विनाअनुदानित तत्त्वावर चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून फाउंडेशनने स्वखर्चाने ही चारा छावणी सुरू ठेवली आहे. याला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नसले तरी, या चारा छावणीत ७ हजार ९५० मोठी आणि १ हजार ७६६ छोटी अशी एकूण ९ हजार ७१६ जनावरे आहेत. या चारा छावणीत सातारा, सांगली, सोलापूर या भागातून शेतकरी आपले पशुधन घेऊन येत आहेत.