कराड (सातारा) - रुग्णाला औषध आणण्यासाठी पुण्याहून बेळगावकडे निघालेल्या मारुती सुझुकी कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास जखिणवाडी (ता. कराड) गाव हद्दीत घडली.
फुलचंद चतुर हे काल आपले नातेवाईक श्रीहरी वाघमारे, बापूसाहेब कांबळे, अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे यांना घेऊन मारुती सुझुकी कारने (एम. एच. 12 एस. क्यू. 1195) पुण्याहून बेळगावकडे निघाले होते. जखिणवाडी गाव हद्दीतील मळाईदेवी पतसंस्थेसमोरील चौकात डाव्या बाजूने आलेल्या अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रीहरी वाघमारे आणि बापूसाहेब कांबळे हे जागीच ठार झाले, तर अश्विनी वाघमारे, रागिनी वाघमारे आणि फुलचंद चतुर हे जखमी झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळी न थांबता पसार झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह अपघात विभागाचे खलिल इनामदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - जातीवाचक नावं होणार हद्दपार....मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाचे स्वागत