सातारा - जवळपास 8 महिन्यांच्या अवकाशानंतर सोमवारी (दि. 23 नोव्हेंबर) सातारा, कराड, वाई, म्हसवड, फलटणसह संपूर्ण जिल्ह्यात नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू झाले. पण, केवळ 19 टक्केच विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातील एकूण 799 पैकी 713 शाळा सुरू झाल्या.
28 हजार 699 इतकेच हजर
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचा एकूण 799 शाळा आहेत. त्यापैकी 713 शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात काल (सोमवार) पहिल्यांदाच घंटा वाजली. जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनांनी गेल्या काही दिवसांपासून झाडलोट, सॅनिटेशन आदी तयारी सुरू केली होती. या चार वर्गांची एकूण पटसंख्या 1 लाख 50 हजार 799 इतकी आहे. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविण्यात आले होते. प्रत्यक्षात 28 हजार 699 इतकेच विद्यार्थी हजर राहिले. हे प्रमाण 19.03 टक्के इतके होते.
पाटणमध्ये सर्वाधिक 42.90 टक्के हजेरी
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 12.63 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. दुर्गम, डोंगराळ समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यात मात्र तब्बल 42.90 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. दुर्गम जावळी तालुक्यातही 26.26 टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. नववी ते बारावीच्या एकूण पटसंख्या पैकी 57 हजार 246 पालकांनी शाळांमध्ये संबंधित संमती पत्र दिली आहेत.
साताऱ्याची राज्यात चौथ्या स्थानावर मजल
इयत्ता नववी ते बारावी चे शाळा वर्ग सुरू करण्यामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 500 शाळा सुरू झाल्या (100 टक्के). गडचिरोली जिल्ह्यात 295 पैकी 272 शाळा सुरू झाल्या (92 टक्के), उस्मानाबाद जिल्ह्यात 491 पैकी 445 शाळा सुरू झाल्या (90.6 टक्के). तर राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या सातारा जिल्ह्यात 799 पैकी 713 शाळा सुरू झाल्या सातारा जिल्ह्याची टक्केवारी 89.2 इतकी असल्याचे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील तालुकानिहाय शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी पुढील प्रमाणे
तालुका - विद्यार्थी उपस्थिती
कराड - 15. 24
कोरेगाव - 24.6
खटाव - 19.36
खंडाळा - 17.40
जावळी - 26.26
पाटण - 42.90
वाई - 17.05
महाबळेश्वर - 12.63
सातारा - 15.94
माण - 22.79
फलटण - 13.80
एकूण - 19.03
हेही वाचा - शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, तर पालकांनी व्यक्त केली चिंता
हेही वाचा - जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगून नोकरीच्या बहाण्याने फसवणारा जेरबंद