सातारा - जिल्ह्यातील १४ महिन्यांच्या बालकास ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बालकाच्या घशातील स्त्रावाचा नमुना 'एनआयव्ही' पुणे येथे पाठविण्यात आला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील सात निकट सहवासितांचे आणि एका 60 वर्षीय महिलेचा असे एकूण आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोविंड19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सात निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्रावाचाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
आज अखेर २६ संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या २२ जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. दोन जणांना कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दोन बाधितांसह चार जणांवर क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.