सांगली - दुष्काळी आटपाडी तालुक्यात संकेत मोरे या पदवीधर तरुणाने तलावात तरंगता पिंजरा पद्धत मत्स्य संवर्धन प्रकल्प उभारला आहे. या तरंगत्या मत्स्य पालन प्रकल्पातून वार्षिक 100 टन माशांच्या उत्पादनाची हमी आहे. तलावातील शाश्वत मत्स्य शेतीचा हा पहिलाच प्रकल्प असून, जिल्ह्यातील तरुणांसाठी हा पथदर्शी बनला आहे.
दुष्काळी तालुक्यात मत्स्य शेती -
आतापर्यंत आपण मत्स्य शेतीचे अनेक प्रकार पाहिलेत. पण, सांगलीतील आटपाडीमधील संकेत शिवाजीराव मोरे या तरुणाने पिंजरा पद्धत मत्स्य शेतीचा अनोखा प्रयोग केला आहे. एकेकाळी दुष्काळी भाग म्हणुन ओळख असलेल्या आटपाडी तालुक्यात हा अऩोखा प्रयोग केला आहे. टेंभू योजनाचे पाणी आटपाडी तालुक्यात पोहचले आहे. सर्व तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मानदेशाच्या या डोंगराळ भागातील तलावात हा मोठा प्रकल्प उभा राहिला आहे. संकेत उच्चशिक्षीत असून, मेकॅनिकल पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य शेती करण्याचे ठरवले.
संकेतचे वडील शासकीय तलावात टेंडर घेऊन त्यात मत्स्य बीज सोडून उत्पादन घेत होते. पण, कधी पाणी आटून तर कधी तलावातील पाणी वाढले की मासे वाहून जायचे, वेळेवर मासे सापडायचे नाहीत. त्यामुळे संकेतने आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संकेतने केंद्रीय मत्स्य विभागाच्या माध्यमातून कोलकाता, तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणांहून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर थेट आपल्या गावी येऊन महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आटपाडीनजीकच्या कामथ येथील तलावात पिंजरा पद्धतीने मत्स्य पालना प्रकल्प उभारला आहे.
हेही वाचा - बळीराजाची चिंता वाढली! 15 तारखेपर्यंत पावसाची शक्यता धूसर!
- तलावात यशस्वी तरंगते पिंजरा मत्स्य शेती -
विशेष म्हणजे, हा पूर्ण प्रकल्प तरंगता आहे. 200 भर प्लास्टिक बॅरलचा वापर करून, तलावात प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी एकूण 75 लाखांचा खर्च आला आहे. तर योजने अंतर्गत 40 टक्के अनुदान मंजूर झाले आहे. संकेतच्या या प्रकल्पामध्ये तिलापिया आणि पंगेसियस या दोन जातीच्या माशांचे उत्पादन घेतले जाते. एकूण 24 पिंजऱ्यात मत्स्य पैदास केली जात असून, यामधून वार्षिक 100 टन इतक्या माशांचे उत्पादन मिळणार आहे. तसेच ज्यावेळी दर चांगला असेल तेव्हाच आपण मासे विकू शकतो आणि मोकळ्या तलावात मासे सापडणे अवघड असते. मात्र, प्रकल्पात आपल्याला जेवढे टन मासे हवेत तेवढे काढता येतात, असे संकेतनेे सांगितले.
- 100 टक्के उत्पादनाची हमी -
सध्या या 24 पिंजऱ्यातील माशांसाठी 400 किलो खाद्य लागते. जसजसे मासे मोठे होत जातात तसे खाद्याची मागणी वाढत जाते. दररोज 20 ते 25 हजार हा फक्त खाद्यावर खर्च होतो. खाद्याची मागणी वाढेल तसा खर्च वाढत जातो. तळ्यात तरंगत्या पद्धतीने असा हा प्रकल्प उभा करणे हे मोठी जोखीम जरी असली तरी या व्यवसायामध्ये अचूक उत्पादनाची गॅरंटी देखील आहे. या पिंजऱ्यात जास्तीत जास्त अडीच किलोपर्यत मासा तयार होतो. पण साधारण 1 किलोपर्यत मासा झाला की त्याची विक्री केली जाते.
- तरुणांना प्रेरणा देणारा प्रकल्प -
संकेत मोरे याने उभारलेला तरंगता पिंजरा मत्स्य पालन प्रकल्प हा इतर तरुणांना प्रेरणा देणारा पथदर्शी प्रकल्प आहे.
हेही वाचा - राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार, राज्य सरकारचे केंद्र सरकारला जशास तसे उत्तर