सांगली - पलूस (Palus) येथील एका अल्पवयीन मुलीची वारंवार छेड काढणाऱ्या तरुणास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सागर सदामते असे या आरोपीचे नाव आहे. सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने (Sangli Court) ही शिक्षा सुनावली आहे. पलूस शहरामध्ये ऑक्टोबर 2014 पासून एका अल्पवयीन पीडित मुलीवर सागर सदामते (वय 27) हा तरुण एकतर्फी प्रेम करत होता. ज्यातून मुलीची वारंवार छेड काढण्याचा प्रकार सागर सदामते याच्याकडून सुरू होता.
मुलीला वारंवार त्रास देऊन छेड काढायचा - मुलीच्या घरासमोरून वारंवार फेऱया मारणे, शाळेला व क्लासला बाहेर जात असताना तिचा पाठलाग, याशिवाय तिला मैत्री करण्यासाठी दमदाटी करणे असे प्रकार सागर याच्याकडून वारंवार सुरू होते. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडील आणि सागरच्या नातेवाईकांनी सागरला समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, तरीही सागर हा मुलीला वारंवार त्रास देऊन छेड काढत होता. या छेडछाडीला आणि त्रासाला कंटाळून पीडित मुलीने पलूस पोलीस ठाण्यामध्ये सागर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सांगली न्यायालयामध्ये खटला सुरु होता.
1 वर्षांसाठी तुरुंगाची सजा - सरकारी पक्षाकडून आठ साक्षीदार तपासण्यात आले आणि सबळ पुरावे व साक्ष या आधारे न्यायालयाने सागर सदामते याला दोषी ठरवले. पोक्सो कायद्याअंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार पाचशे रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास आणखी दोन महिने सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाकडून अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र हिंगमिरे यांनी याखटल्याचे काम पाहिले.