सांगली - श्री महांकाली साखर कारखान्याच्या थकित देणी आणि विविध मागण्यांसाठी कामगार आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर शुक्रवारी धडक मोर्चा काढला. ऊसाची उपलब्धता असताना आणि थकीत देणी न देताच कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
हेही वाचा - बोगस कागदपत्रांचा 'असा'ही वापर; भामट्यांनी सरकारला लावला १० हजार कोटींचा चूना
सांगलीच्या कवठेमंकाळ येथील श्री महांकाली साखर कारखाना यंदा ऊसाची उपलब्धता नसल्याने बंद करण्यात आला आहे. कारखाना प्रशासनाकडून साखर आयुक्त कार्यालयाकडे याबाबत पत्रही देण्यात आले आहे. मात्र, या कारखान्यातल्या कामगारांचे थकीत वेतन आणि शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारखान्यातील सहाशे कर्मचाऱ्यांचे गेल्या 11 महिन्यांपासूनचे वेतन थकीत आहे. त्याचबरोबर 44 महिन्यांचा फंड आणि ग्रॅच्युटी कारखाना प्रशासनाकडून जमा करण्यात आली नाही. दोनशेहून अधिक निवृत्त कामगारांचे फंड आणि ग्रॅच्युटी भरली गेली नसल्याने निवृत्त कामगारांना पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा - हैदराबादमधील एन्काऊंटर वादात; अनेकांची चौकशीची मागणी
कारखाना प्रशासनाने कारखाना बंद ठेवत कामगारांना सुट्टी दिली आहे. मात्र, थकीत देणी दिल्याशिवाय सुट्टी देणे आणि कारखाना परिसरात सुमारे 5 ते 6 लाख टन ऊस उपलब्ध असताना कारखाना बंद करणे चुकीचे असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. थकीत वेतन, फंड यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी कामगारांनी थेट कारखाना प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. आपल्या मागण्यांसाठी कारखाना परिसरातुन कवठेमहांकाळ शहरातील प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर कारखाना प्रशासनाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले ही थकीत आहेत. त्यामुळे थकीत देणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.
हेही वाचा - कायद्याचा अभ्यासक म्हणून हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन करणार नाही- उज्ज्वल निकम
दरम्यान, भ्रष्ट प्रशासनाची चौकशी करून तातडीने कामगार आणि शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यात यावीत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन कवठेमहांकाळ तहसीलदार यांना देण्यात आले आहे.