सांगली - तासगाव शहरातील सोमवार पेठ येथील एका घरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी खळखट्ट्याक केला आहे. महिलांनी हा मटका अड्डा उद्ध्वस्त केला आहे. यावेळी मनसेच्या महिला पदाधिकारी आणि मटका चालकामध्ये जोरदार वाद झाला.
हेही वाचा - मिरज रेल्वे जंक्शनचे रात्रीतच अण्णाभाऊ साठे नामकरण!
मटका अड्ड्यावर मनसेच्या रणरागिणी
ही घटना मंगळवारी घडली. शहरातल्या बद्रुद्दिन तांबोळी नामक व्यक्तीच्या घरामध्ये एका भाड्याच्या खोलीत मटका व्यवसाय सुरू होता. याबाबत मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी तासगाव पोलिसांना शहरातल्या मटका व्यवसाय विरोधात कारवाईची मागणी केली होती. मनसेच्या दिपाली पुडकर यांनी काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी आणि तासगाव उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांच्याकडे निवेदनही केले होते. मात्र, मटक्याविरोधात पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने काल दुपारी मनसेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिपाली पुडकर यांच्या नेतृत्वाखाली थेट मटका अड्डा सुरू असलेल्या घरावर हल्लाबोल केला आणि घरामध्ये घुसून सुरू असलेला मटक्याचा व्यवसाय उद्ध्वस्त केला.
साहित्यांची केली तोडफोड
आक्रमक मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या साहित्यांची तोडफोड केली. यावेळी मटका चालक व मनसेच्या महिला आघाडी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या ठिकाणी मटका चालवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली. संतोष अशोक राक्षे, प्रमोद प्रकाश मगदूम, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मटका व्यवसायवर कारवाई करा
तर शहरात आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मटका सुरू असून यामुळे सामान्य महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे, पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेला मटका व्यवसाय बंद करावा, अशी मागणी दिपाली पुडकर यांनी केली.
हेही वाचा - एफआरपी आंदोलनाची ठिणगी भडकली; क्रांती कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवले