सांगली - मिरजेत झालेल्या एका अपघातात मुली समोर आईचा दुर्दैवी अंत झाला आहे. ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने आईचा जागीच मृत्यू झाला आहे. नदीवेस म्हैसाळ रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली. मिरजेच्या इनाम धामणी येथील राहणाऱ्या कुसुम कल्लाप्पा सौदे (वय 45) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. मयत झालेल्या कुसुम सौदे व त्यांची मुलगी उमाश्री कलाप्पा सैदे (वय 18) या दोघी कर्नाटकच्या कागवाड येथे आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त गेल्या होत्या.
काम झाल्यानंतर म्हैसाळ रस्त्याने दोघी मायलेकी इनाम धामणी गावी परत निघाल्या होत्या. यावेळी त्या दोघी मिरज शहरातील नदीवेस येथील अण्णाभाऊ साठेनगरजवळ पोहचल्या, दरम्यान याठिकाणी नवीन रस्ता करण्याचे काम सुरू असल्याने रस्त्याकडेला खडी पसरली होती. या खडीवरून दुचाकी घसरून रस्त्यावर पडली, त्याच वेळी मागून आलेल्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरच्या चाकाखाली कुसुम सौदे आल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. आपल्या डोळ्यासमोर आईचा दुर्दैवी अंत पाहून मुलीने आक्रोश सुरू केला होता. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक तरुणांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून ट्रॅक्टर पकडला. अपघात झाल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या अपघाताची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.