सांगली - 2024 मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घरी पाठवू, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. इस्लामपूर या ठिकाणी आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
निवडणुकीवेळी एकत्र राहिले पाहिजे...
इस्लामपूरच्या पेठ नाका येथील महाडिक शैक्षणिक संकुलातील वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पहिल्या चित्राचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा मांडत कार्यकर्त्यांनी पक्षात जरूर भांडले पाहिजे, पण ते चार वर्ष आठ महिन्यांसाठी आणि दोन महिन्यांसाठी एकत्र काम केले पाहिजे, तरच आपण जिंकू शकतो, असा कानमंत्र यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला.
तसेच कोल्हापूर लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना, आम्ही युतीसाठी युद्ध केले, आम्ही शांत राहिलो असतो तर मुन्ना महाडिक विजयी झाले असते आणि त्याची खंत मनात आहे.
जयंत पाटलांना घरी पाठवू
आगामी 2024 विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत बोलताना, कार्यकर्त्यांची सोबत असेल तर 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा पराभव करून त्यांना घरी पाठवू. तसेच, गेल्या वेळी ते शक्य झाले असते जर आपल्यात एकजूट असती, त्यामुळे आता एकजुटीने लढू, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.