सांगली - क्षुल्लक वादातून पतीने पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. ही घटना सांगलीतील मिरजमध्ये घडली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
पवार गल्ली परिसरातील नदी वेस येथील मलगोंडा रायगोंडा पाटील (वय 61) यांचा पत्नी सुमन पाटील (वय 50) यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला. मात्र, वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात त्यांनी पत्नीच्या डोक्यात खुरप्याचा वार करून त्यांची हत्या केली. पत्नी मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर मलगोंडा पाटील यांनी घराला कुलूप घालून थेट मिरज पोलीस ठाणे गाठले आणि आपण पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
हेही वाचा - नागपूर: पाणीपुरी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल
पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी सुमन पाटील या रक्ताचा थारोळ्यात पडल्या होत्या. याबाबत पोलिसांनी पंचनाम केला. मलगोंडा पाटील हे शेतमजूर म्हणून काम करतात. पत्नीसोबत क्षुल्ल्क कारणामुळे वाद होऊन, त्या रागातून हा खून केल्याचे स्व:त पोलिसांनी सांगितले. काही वेळातच घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.