सांगली - जिल्ह्यात या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वाळवा तालुक्यात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील अनेक ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत. अनेक परिसर जलमय झाले असून माळरानातून खळाळणाऱ्या पाण्यामुळे परिसराला निसर्ग पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अशाच प्रकारे तालुक्यातील लाडेगावचा दगडी बंधार पावसाच्या पाण्यामुळे भरून ओसंडून वाहू लागला असल्याने या बंधाऱ्याला लहानश्या धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आजूबाजूच्या विहिरीही ओसंडून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लाडेगावच्या उत्तर दिशेला असलेला दगडी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. बंधारा सध्या ओसंडून वाहू लागल्याने परिसरातील शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येणार आहे. आमदार शिवाजीराव नाईक यांनी सुचीत केल्यानंतर जिल्हा परिषेदेच्या स्वयनिधीतून हा दगडी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याचा परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बंधार पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील काळात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहेत.
जल है तो कल है या म्हणीप्रमाणे लाडेगावचे लोकनियुक्त सरपंच रणधीर पाटील यांनी मा.आमदार शिवाजीराव नाईक यांच्याकडे सातत्याने गावाच्या ओढ्यावर ठीक ठिकाणी नवीन बंधारे बांधने व जुने दगडी-बंधारे दुरुस्त करण्याबाबत पाठपुरावा केला होता. दरम्यान, सध्या या परिसरातील केटी पद्धतीने बांधण्यात आलेले दगडी बंधारे वाहू लागल्याने या बंधाऱ्यांना निसर्ग पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लाडेगावातील ग्रामस्थ हा ओसंडून वाहणारा बंधारा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तर शेतकरी वर्गातून बंधार भरल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.